जतवार्ता न्यूज नेटवर्क;
संख जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना युवा तालुकाप्रमुख प्रवीण आवरादी यांच्या सौभाग्यवती सौ. कावेरी प्रवीण आवरादी यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिकृतरित्या दाखल केला. यावेळी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत सौ. कावेरी आवरादी यांनी पदाधिकारी व समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने, संख जि. प. गटातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले.
सौ. कावेरी आवरादी या सामाजिक, शैक्षणिक व महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले. महिला सक्षमीकरण, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण व ग्रामीण विकास ही त्यांची प्रमुख प्राधान्ये असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रभावीपणे आवाज उठवणार असून विकासकामांना गती देण्याचा निर्धार आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, तालुका प्रमुख अंकुश हुवाळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. उपस्थितांनी सौ. कावेरी आवरादी यांच्या उमेदवारीचे स्वागत करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
एकूणच, संख जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढतीत शिवसेना शिंदे गटाने दमदार शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिल्याने आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

