जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी संख जिल्हा परिषद गटामधून जनस्वराज्य पक्षाकडून प्रियांका रघुनाथ सबकाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिकृतरित्या सादर केला. त्याचबरोबर गिरगाव पंचायत समिती गणातून नागनाथ मोटे व संख पंचायत समिती गणातून बिरप्पा खोत यांनीही जनस्वराज्य पक्षाकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
संख जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासून जनस्वराज्य पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून या मतदारसंघात पक्षाला मोठा जनाधार लाभलेला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक कोरे सावकार यांनी यापूर्वी या मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रित करून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांमुळे या भागात जनस्वराज्य पक्षाची भक्कम पकड निर्माण झाली आहे.
या मतदारसंघातून यापूर्वी स्वर्गीय बसवराज पाटील हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते व त्यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा मान मिळाला होता. तसेच जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला सदस्य होण्याचा मान सौ. सुजाता पाटील यांना मिळाला होता. गिरगाव पंचायत समिती गणामधून जनस्वराज्य पक्षाकडून ऍड. अडव्याप्पा घेरडे हे निवडून येत त्यांनीही जत पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली होती.
जनस्वराज्य पक्षाने संख जिल्हा परिषद गटात आजपर्यंत राबवलेल्या विविध विकासकामांच्या जोरावरच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. जनतेच्या विश्वासावर आणि केलेल्या कामांवर आधारित आमचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास युवा नेते नागनाथ मोटे व रघुनाथ सबकाळे यांनी व्यक्त केला आहे.


