जतवार्ता न्यूज नेटवर्क;
दरीबडची पंचायत समिती गणातून दरेश्वर शिवाजी चौगुले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिकृतरित्या सादर केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून त्यांना पाठिंबा दिला.
दरीबडची गणातील सुज्ञ मतदार व नागरिकांच्या आग्रहास्तव तसेच भागातील सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने आपण ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवत असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, मी एका सर्वसामान्य कुटुंबातील ऊसतोड कामगाराचा मुलगा असून सामान्य जनतेच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा मला जवळून माहीत आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून शेती, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा आपला संकल्प आहे.
भागातील विकास कामे पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन पारदर्शक व प्रभावीपणे राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सर्व घटकांचा समतोल विकास, शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय आणि युवकांना संधी उपलब्ध करून देणे, हे आपल्या कार्यकाळातील प्रमुख उद्दिष्ट राहतील, असेही चौगुले यांनी सांगितले.
दरीबडची गणातील जनतेने मला मतदानरूपी आशीर्वाद देऊन पंचायत समितीत काम करण्याची संधी द्यावी व माझा विजय निश्चित करावा, असे आवाहन दरेश्वर चौगुले यांनी यावेळी केले.

