जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांच्यामध्ये समाजिक बांधिलकी निर्माण होते. विकसित भारतासाठी व मानवतेसाठी युवकांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक प्रमुख साधन आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांना समाजातील समस्या व गरजा समजून घेण्याची संधी मिळते. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, स्वावलंबन तसेच सामाजिक बांधिलकी विकसित होते.
असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ.शिवाजीराव बिसले यांनी केले.
ते मौजे रामपूर (ता.जत) येथे राजे रामराव महाविद्यालय,जत च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या "विशेष श्रमसंस्कार शिबीरराच्या उद् घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामपूर गावचे पोलिस पाटील श्री.प्रविण निकम हे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व स्वागताध्यक्ष डॉ.सुरेश पाटील, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.कृष्णा रानगर, डॉ.एम.बी.सज्जन, रामपूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.चौगुले सर, बिळुरचे माजी मुख्याध्यापक श्री.बामणे सर उपस्थित होते.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य व उद् घाटन समारंभाचे स्वागताध्यक्ष डॉ.सुरेश पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करुन सात दिवस चालणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराची माहिती सांगितली. या विशेष शिबिरात ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबीर, वृक्षसंवर्धन, एड्स जनजागृती, जलसाक्षरता, महिला सबलीकरण, पर्यावरण जागृती, सांडपाणी व्यवस्थापन तसेच प्रदूषणविषयक जनजागृती, शाश्वत शेतीसाठी शेतकरी मेळावा, अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान, ग्राहक पंचायत जनजागृती, कायदेविषयक जनजागृती व्याख्यान असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून शिबिराच्या कालावधीत विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली असून जलसंधारण व शाश्वत विकासामध्ये युवकांचा सहभाग या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने शिबीर राबविण्यात येत असल्याचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना गावचे पोलिस पाटील प्रविण निकम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे सामाजिक समस्या व गरजा समजून घेण्याची संधी मिळते. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, स्वावलंबन तसेच सामाजिक बांधिलकी विकसित होते. असे त्यांनी सांगितले.
यावेळी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.कृष्णा रानगर यांनी एन.एस.एस. स्वयंसेवकांनी गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करुन जीवनात यशस्वी होण्यासाठी शारीरिक श्रमांसोबत अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुमार इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सोमनाथ गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्य, स्वयंसेवक, प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

