yuva MAharashtra प्राची हिंगमिरे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देणार – संजय विभुते

प्राची हिंगमिरे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देणार – संजय विभुते

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     बनाळी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्राची महादेव हिंगमिरे, बनाळी पंचायत समिती गणातून आण्णासो कोडग तसेच येळवी पंचायत समिती गणातून अशोक गोरड यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ बनाळी येथील श्री. बनशंकरी देवीच्या आशीर्वादाने उत्साहात पार पडला.
     या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, युवा सेना जिल्हाप्रमुख मिलिंद कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुते यांनी, “प्राची महादेव हिंगमिरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास आगामी काळात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्यात येईल,” अशी ठाम घोषणा केली. तसेच बनाळी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करत, “या गटाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांसाठी शिवसेना कटिबद्ध राहील,” असा विश्वासही त्यांनी दिला.
     डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनीही उमेदवारांना शुभेच्छा देत, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि कर्तृत्ववान प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन केले. युवा सेना प्रमुख मिलिंद कदम यांनी युवकांना संघटित होऊन शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन केले.
     कार्यक्रमादरम्यान देवीचे पूजन, घोषणा व जल्लोषाच्या वातावरणात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. बनाळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. या प्रचार शुभारंभामुळे बनाळी परिसरात शिवसेनेच्या प्रचाराला मोठी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.