yuva MAharashtra मेसेज व संगणकाच्या युगामुळे सुंदर हस्ताक्षरांचा लोप; प्राचार्य डॉ.सुरेश पाटील

मेसेज व संगणकाच्या युगामुळे सुंदर हस्ताक्षरांचा लोप; प्राचार्य डॉ.सुरेश पाटील

जत वार्ता न्यूज
By -

मराठी विभागाच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
      आज सुंदर हस्ताक्षर, म्हणी, वाक्यप्रचार, उखाणे, पारंपारिक लोकगीते असे मराठी भाषेतील मौलिक धन, लोककला लोप पावत चालल्या आहेत. पण मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अशा भाषिक कलांचे संवर्धन होत आहे. पूर्वी सुंदर हस्ताक्षरांवरुन विद्यार्थी ओळखला जायचा. सुंदर हस्ताक्षरामुळे आपली स्वतःची ओळख निर्माण होत असे. पण आता मेसेज व संगणकाच्या युगामुळे सुंदर हस्ताक्षर लोप पावत चालले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले.
        ते राजे रामराव महाविद्यालय,जत येथे मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित हस्ताक्षर  स्पर्धेच्या उद् घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दीपक कांबळे उपस्थित होते. यावेळी ग्रंथालय समिती प्रमुख डॉ.लक्ष्मण भरगंडे, प्रा.कृष्णा रामनगर उपस्थित होते. प्रारंभी मराठी विभागप्रमुख प्रा.कुमार इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यामागील उद्देश सांगून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांची व कार्यक्रमांची माहिती दिली.
          यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा.दीपक कांबळे म्हणाले की, सुंदर हस्ताक्षर काढणे ही एक कला असून सुंदर हस्ताक्षर काढायचे असतील तर शाईचा पेन वापरला पाहिजे. कारण शाईचा पेन ठराविक अँगल मध्येच धरावा लागतो. त्यामुळे आपले हस्ताक्षर वळणदार होण्यास मदत होते, असे सांगून त्यांनी सुंदर हस्ताक्षर कसे काढावे, पेनचा वापर कसा करावा यासाठी त्यांनी  सोप्या सोप्या टिप्स सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हस्ताक्षर स्पर्धेचे समन्वयक प्रा.सदाशिव माळी यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा.कुमार इंगळे, प्रा.सदाशिव माळी, डॉ.ज्ञानेश्वर कांबळे व प्राध्यापिका रेश्मा लवटे यांनी परिश्रम घेतले.