जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने गांजा विक्री करणाऱ्या एका संशयितावर धडक कारवाई करत २ किलो वजनाचा गांजा व सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूस गांजा विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने सापळा रचला.
कारवाईदरम्यान नवाज सलीम मकानदार (वय ३२, रा. प्रताप कॉलनी, रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) हा संशयित मोटारसायकलवरून येताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून २ किलो तयार गांजा (किंमत सुमारे ५० हजार रुपये), मोटारसायकल व इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(ब), २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता दि. २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अमली पदार्थ विक्री व वितरणाविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी अशा गैरप्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

