yuva MAharashtra शेगांव जि.प. गटातून डॉ. शिवाजी खिलारे, पंचायत समिती गणातून अर्चना पाटील व सचिन बोराडे निवडणूक रिंगणात

शेगांव जि.प. गटातून डॉ. शिवाजी खिलारे, पंचायत समिती गणातून अर्चना पाटील व सचिन बोराडे निवडणूक रिंगणात

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     शेगांव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. शिवाजी खिलारे, तर शेगांव पंचायत समिती गणातून सचिन बोराडे आणि कोसारी पंचायत समिती गणातून सौ. अर्चना नाथा पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उत्साहपूर्ण वातावरणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
     डॉ. शिवाजी खिलारे हे गेली अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपल्या कार्यकाळात समाजाभिमुख कार्याची ठोस ओळख निर्माण केली आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी अनेक गरजू रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देत मोलाची सेवा बजावली. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, शैक्षणिक व शेती क्षेत्रातही ते सक्रिय असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
     कुंभारी गावचे युवा नेते नाथा पाटील यांच्या सौभाग्यवती तथा जत पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ. अर्चना पाटील यांनी आपल्या कार्यकाळात विकासकामांना विशेष प्राधान्य दिले. त्यांनी जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी आपल्या मतदारसंघात आणून रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व मूलभूत सुविधांच्या कामांना चालना दिली. तसेच विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे दीड कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळवून विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.
     शेगांव पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सचिन बोराडे हेही कार्यतत्पर व लोकसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. युवकांचे प्रश्न, रोजगार, शेती व ग्रामीण विकासासाठी ते सातत्याने कार्यरत असून, जनतेशी थेट संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे.
     विकासाभिमुख नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला. शेगांव व कोसारी परिसरात भाजपने सक्षम, अनुभवी व लोकाभिमुख उमेदवार दिल्याने निवडणूक प्रचाराला वेग येणार असून, आगामी निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.