जतवार्ता न्यूज नेटवर्क;
डफळापूर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून आकाराम मासाळ यांच्या स्नुषा स्वप्नाली मनोज मासाळ यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे. या उमेदवारीमुळे डफळापूर गटातील राजकीय वातावरण तापले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आकाराम मासाळ यांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे व पाठपुराव्यामुळे डफळापूर व परिसरातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांच्या विकासात लक्षणीय कामगिरी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर स्वप्नाली मनोज मासाळ यांनी जनतेच्या सेवेसाठी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. डफळापूर जिल्हा परिषद गटातील नागरिकांकडून आपल्याला मोठा प्रतिसाद व भक्कम पाठिंबा मिळत असल्याने ही निवडणूक आत्मविश्वासाने लढवत असल्याचे आकाराम मासाळ यांनी सांगितले.
“जनतेने आतापर्यंत आम्हाला दिलेला विश्वास आणि पाठिंबा हेच आमचे बळ आहे. विकासकामांचा वेग अधिक वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी व भरघोस मतांनी निवडून द्यावे,” असे आवाहन आकाराम मासाळ यांनी मतदारांना केले.


