जतवार्ता न्यूज नेटवर्क;
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मतदारसंघातच प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापजनक चित्र उभे राहिले असून, सेवाशक्ती संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा एस.टी. चालक बाबुराव शंकर व्हनखंडे हे जत आगार व्यवस्थापक सुनंदा देसाई यांच्या अन्यायकारक व हुकूमशाही कारभाराविरोधात बेमुदत उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा आज पाचवा दिवस असून व्हनखंडे यांची तब्येत खालावत असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे.
व्हनखंडे यांच्यावर शिस्तभंग व आवेदन कार्यपद्धती डावलून, तसेच नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना छेद देत दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणतीही योग्य चौकशी न करता करण्यात आलेली ही कारवाई तात्काळ मागे घ्यावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
विशेष बाब म्हणजे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या सेवाशक्ती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यावरच त्यांच्या मतदारसंघात अन्याय होत असल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची दखल घेत आमदार पडळकर यांनी स्वतः जत आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन सखोल चौकशी करून तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र, आमदारांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आगार व्यवस्थापकांनी कोणतीही सकारात्मक पावले उचललेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “कामगारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, उपोषण करते व्हनखंडे यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे वातावरण असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाकडे वरिष्ठ एस.टी. प्रशासन व राज्य शासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

