yuva MAharashtra बहुमत असूनही भाजपला धक्का! जत नगरपरिषदेच्या विषय समिती निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादीची खेळी, दोन सभापती पदांवर पाणी

बहुमत असूनही भाजपला धक्का! जत नगरपरिषदेच्या विषय समिती निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादीची खेळी, दोन सभापती पदांवर पाणी

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत नगरपरिषदेच्या विषय समिती तसेच सभापती निवडीत मंगळवारी राजकीय नाट्य रंगले. स्पष्ट बहुमत असूनही भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची साथ घेत चतुर राजकीय खेळी करत स्वतःसह राष्ट्रवादीच्या पदरातही प्रत्येकी एक सभापती पद पाडून घेतले. परिणामी भाजपला दोन महत्त्वाच्या सभापती पदांपासून वंचित राहावे लागले.
     नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती सभापती निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या सभेत सुरुवातीपासूनच तणावपूर्ण वातावरण होते. एका अपक्ष नगरसेवकासह भाजपकडे बहुमत असल्याने सर्व विषय समित्यांवर भाजपचाच वरचष्मा राहील, अशी जोरदार चर्चा होती. विशेषतः उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी (अ. प. गट) ने भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे भाजपला सर्वच समित्या मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
     मात्र, ऐनवेळी काँग्रेसने राजकीय डावपेच आखत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सोबत घेत समीकरण बदलले. या अनपेक्षित हालचालीमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आणि सभापती पदांचे गणित पूर्णपणे उलटले. काँग्रेसला महिला व बालविकास समितीचे सभापती पद मिळाले, तर राष्ट्रवादी (अ. प. गट) ने शालेय शिक्षण समितीचे सभापती पद आपल्या पदरात पाडून घेतले.

मंगळवारी झालेल्या विषय समिती सभापतींची निवड पुढीलप्रमाणे झाली –
स्वच्छता व आरोग्य समिती : गौतम ऐवळे (भाजप)
सार्वजनिक बांधकाम समिती : मिथून भिसे (भाजप)
पाणीपुरवठा व जलनिसारण समिती : फिरोज नदाफ (अपक्ष)
महिला व बालविकास समिती : सौ. सुप्रिया बामणे (काँग्रेस)
शालेय शिक्षण समिती : इम्रान गवंडी (राष्ट्रवादी काँग्रेस – अ. प. गट)
     तर नियमाप्रमाणे विकास व नियोजन समिती ही उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांच्याकडे राहिली आहे.
भाजपकडे बहुमत असतानाही काँग्रेसच्या यशस्वी खेळीमुळे दोन सभापती पदांवर पाणी फिरले आहे. याशिवाय, अपक्ष नगरसेवकाची साथ मिळवण्यासाठी त्यांना सभापती पद देण्याचा शब्द दिल्याने भाजपला आणखी एक पद सोडावे लागले. परिणामी भाजपच्या पदरात केवळ दोनच सभापती पदे राहिली.
     या निकालामुळे जत नगरपरिषदेच्या राजकारणात नव्या चर्चा रंगल्या असून, आगामी काळात नगरपरिषदेत निर्णय घेताना सत्ताधारी भाजपला विरोधकांच्या या नव्या एकजुटीचा सामना करावा लागणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.