जतवार्ता न्यूज नेटवर्क;
डफळापूर जिल्हा परिषद गटातील राजकीय घडामोडींना निर्णायक वळण मिळाले असून महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले शंकर वगरे सर यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरल्याने त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुचकाच्या जागी उमेदवाराची स्वाक्षरी झाल्याने त्यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज बाद झाला होता. याचबरोबर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, सखोल विचारांती व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शंकर वगरे सर यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेत डफळापूर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या आकाराम मासाळ यांच्या स्नुषा स्वप्नाली मनोज मासाळ यांना तसेच भाजपच्या पूर्ण पॅनलला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना शंकर वगरे सर म्हणाले की, डफळापूर जिल्हा परिषद गट महिला आरक्षणाचा असल्याने मी माझ्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भागातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वत्र भेटीगाठी घेऊन जनसंपर्कही केला. मात्र काही कारणास्तव उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचे स्पष्ट मत होते की, भागातील व तालुक्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सत्तेबरोबर राहणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजपसोबत राहण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांच्या मताचा आदर ठेवून मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ते पुढे म्हणाले की, तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच माझे नेते, धनगर महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय डांगे आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे काम अधिक बळकट करेन. तालुक्यातील व डफळापूर गटातील सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. डफळापूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्वप्नाली मनोज मासाळ, बाज पंचायत समितीच्या उमेदवार मनीषा दुधाळ तसेच डफळापूर पंचायत समितीचे उमेदवार महेश गावडे या तिन्ही उमेदवारांना ताकदीनिशी निवडून आणून या गटावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी आकाराम मासाळ यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आमचे सहकारी मित्र शंकर वगरे सर आणि आम्ही बऱ्याच दिवसांपासून एकत्र येण्याबाबत चर्चा करत होतो; मात्र तसा योग जुळून येत नव्हता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर व डांगे आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली वगरे सर यांनी भारतीय जनता पार्टीला निस्वार्थ पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या येण्याने पक्षाला मोठी बळकटी मिळणार असून त्याचा थेट फायदा निवडणुकीत होईल. भाजपचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या घडामोडीमुळे डफळापूर जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढतीत भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

