yuva MAharashtra जत येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीच्या निवडी जाहीर; अध्यक्षपदी श्रीनाथ बुरुटे तर उपाध्यक्षपदी कांबळे ;उत्सव नियोजनासाठी सामूहिक बैठक

जत येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीच्या निवडी जाहीर; अध्यक्षपदी श्रीनाथ बुरुटे तर उपाध्यक्षपदी कांबळे ;उत्सव नियोजनासाठी सामूहिक बैठक

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत शहरात संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. याचवेळी जयंती उत्सव कशाप्रकारे साजरा करायचा, कार्यक्रमांची रूपरेषा, सामाजिक उपक्रम व मिरवणुकीचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी एक सामूहिक बैठक पार पडली. या बैठकीला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या बैठकीत सर्वानुमते जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ बुरुटे यांची, उपाध्यक्षपदी अभिजीत कांबळे यांची, तर खजिनदारपदी धीरज साळे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित समाजबांधवांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
     यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक सलोखा, युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करणारे उपक्रम, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा व प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. जयंती उत्सव शांततापूर्ण, शिस्तबद्ध व उत्साहात साजरा करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
     नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीनाथ बुरुटे यांनी मार्गदर्शन करताना सर्व समाजबांधवांच्या सहकार्याने जयंती उत्सव आदर्श पद्धतीने साजरा केला जाईल, असे आश्वासन दिले. उपाध्यक्ष अभिजीत कांबळे व खजिनदार धीरज साळे यांनीही नियोजनात पारदर्शकता व सहभागात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
     बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी संत रोहिदास महाराजांच्या विचारांना अभिवादन करून जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.