yuva MAharashtra जत येथे जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंत्यास ८८ हजारांची लाच घेताना जेरबंद | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; शासकीय निवासस्थानी सापळा

जत येथे जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंत्यास ८८ हजारांची लाच घेताना जेरबंद | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; शासकीय निवासस्थानी सापळा

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | सांगली :
     जिल्हा परिषद शाळांच्या बांधकाम दुरुस्ती कामांच्या बिलासाठी ८८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जत येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) संजय भगवान सुतार (वय ४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई जत येथील शासकीय निवासस्थान परिसरात सापळा रचून करण्यात आली.
     तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकाम व दुरुस्ती कामांच्या मोजमाप नोंदी (एम.बी. बुक) तयार करून बिल मंजुरीसाठी आरोपीने दोन टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली होती. तीन बिलांसाठी एकूण ८८ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे समोर आले.
     तक्रार प्राप्त झाल्यानंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा रचला. आरोपीने तक्रारदाराकडून ८८ हजार रुपये स्वीकारताच त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
     ही कारवाई पोलिस अधीक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक यासीन इनामदार, पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.