अवैध बायोडिझेल साठ्यावर कारवाई; संतोष चव्हाण यांना प्रशस्तीपत्र प्रदान
अवैध बायोडिझेल साठा जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पो.कॉ. संतोष जयराम चव्हाण यांना सांगली पोलीस दलातर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संदिप घुगे, पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जत येथे कार्यरत असलेले पो.कॉ. संतोष चव्हाण यांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत २९ लाख ६७ हजार ३९० रुपयांच्या किमतीचा सुमारे १९,२०० लिटर अवैध बायोडिझेल साठा, संबंधित उपकरणे व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध इंधन साठा व विक्री करणाऱ्या रॅकेटला मोठा आळा बसला आहे.
सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा क्रमांक ०४/२०२६ नोंद करत भा.दं.वि. कलम २८५, ३३६(४) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या धाडसी आणि परिणामकारक कारवाईबद्दल संतोष चव्हाण यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
प्रशस्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, चव्हाण यांनी कर्तव्यदक्षता व तत्परता दाखवत उत्कृष्ट कामगिरी बजावली असून भविष्यातही अशाच प्रकारे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हा सन्मान समारंभ सांगली येथे पार पडला. पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या कार्यामुळे विभागाची प्रतिमा उंचावली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

