yuva MAharashtra राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न | विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न | विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :
     येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने पारंपारिक वेशभूषा दिन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून पारंपारिक दिन साजरा केला. यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
      या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पारंपारिक वेशभूषेचे ज्ञान आजच्या पिढीला व्हावे. आपली परंपरा व संस्कृती याचा अभ्यास आजच्या तरुण पिढीने करावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये एकपात्री अभिनय, उत्कृष्ट वेशभूषा, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गीत गायन व लघु नाटक इत्यादींचा समावेश होता. 
       या पारंपारिक वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.सतिशकुमार पडोळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रेश्मा लवटे तर आभार प्रा.रवींद्र काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.