जतवार्ता न्यूज नेटवर्क;
शेगांव जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भारतीय जनता पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची आणि निकराची लढत पाहायला मिळत आहे. प्रचाराची धग वाढत असताना मतदारांवर निर्णायक प्रभाव टाकण्यासाठी दोन्ही आघाड्यांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शेवटची ताकद पणाला लावताना दिसत आहेत.
भाजपकडून शेगांव जिल्हा परिषद गटासाठी डॉ. शिवाजी खिलारे, पंचायत समिती गणासाठी सचिन बोराडे तसेच कोसारी गणासाठी सौ. अर्चना पाटील हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून परशुराम सांगोलकर, साहेबराव शिंदे आणि दिपाली सतीश चव्हाण हे उमेदवार उभे आहेत.
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावर भर देण्यात येत असून, पदयात्रा आणि प्रत्यक्ष मतदारभेटीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जपलेल्या लोकसंपर्काचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडण्यात येत आहे. दैनंदिन जीवनातील प्रश्न, सामाजिक कार्य तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या कामांची आठवण करून देत मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विशेषतः जत तालुका भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. अंजना भानूदास नरळे व सौ. सारिका खिलारे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण शेगांव मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. या पदयात्रेतून “फक्त निवडणूक काळातच दिसणाऱ्या नेत्यां”वर मार्मिक शब्दांत टीका करत, सातत्याने जनतेसोबत उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात येत आहे.
या दरम्यान डॉ. शिवाजीराव खिलारे, युवा नेते सचिन बोराडे आणि युवा नेते नाराज पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या विविध सामाजिक, विकासात्मक व जनहिताच्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे. “या कामांची उतराई अमूल्य मतदानाच्या स्वरूपात करावी,” असे आवाहनही मतदारांना करण्यात येत आहे.
सौ. अंजना नरळे व सौ. सारिका खिलारे यांच्या आवाहनाला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वाढता जनसमर्थन पाहता भाजप उमेदवार डॉ. शिवाजीराव खिलारे, सचिन बोराडे आणि सौ. अर्चना पाटील हे उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास सौ. अंजना नरळे यांनी व्यक्त केला आहे. “या निवडणुकीत भाजपा उमेदवार घासून नव्हे… ठासून येणार!” असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

