जतवार्ता न्यूज नेटवर्क :
जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू असतानाच वळसंग (ता. जत) येथे भानामतीचा संशय येईल असा अघोरी प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळातही विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
जत तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणांसाठी दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मुचंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना (शिंदे गट) कडून श्रीकांत कृष्णा गुरव, काँग्रेसकडून रमेश इरगोंडा पाटील, तर भाजपकडून रमेश गंगान्ना देवर्षी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
त्याचबरोबर मुचंडी पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या अश्विनी मोरे, भाजपच्या सुनीता बेडगे आणि अपक्ष उमेदवार रुपाली नरळे यांच्यात चुरशीची लढत रंगली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
अशा पार्श्वभूमीवर वळसंग गावातील मारुती मंदिर परिसरात संशयास्पद वस्तू आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. घटनास्थळी एका ताटात लाल कापडात गुंडाळलेली काळी बाहुली, मंत्र लिहिलेला छापील कागद, लिंबू, हळद, कुंकू व गुलाल अशा वस्तू ठेवण्यात आल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून “भानामती” किंवा अघोरी कृत्य असल्याची चर्चा गावभर सुरू आहे.
निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या घटना घडणे हे गावातील सामाजिक शांततेसाठी आणि निवडणूक प्रक्रियेसाठी चिंतेचे मानले जात आहे. या घटनेमागे नेमका उद्देश काय? कोणी व का असा प्रकार केला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी व सत्य परिस्थितीचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिस व प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अंधश्रद्धा समाजाला अज्ञान, भीती आणि गैरसमजांच्या अंधारात ढकलते. भानामती, जादूटोणा, टोणगे-मंत्र यांसारख्या गोष्टींना शास्त्रीय आधार नाही. अशा प्रकारांमुळे माणसाची मानसिक शांतता बिघडते, सामाजिक तणाव वाढतो आणि कधी कधी आर्थिक व शारीरिक नुकसानही होते.
आज विज्ञान, शिक्षण आणि कायदे उपलब्ध असताना कोणत्याही घटनेमागे तर्क, कारण-परिणाम आणि पुरावे शोधणे आवश्यक आहे. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्याऐवजी विवेकबुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कायद्यावर विश्वास ठेवणे हेच समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. संशयास्पद घटना आढळल्यास घाबरून न जाता संबंधित प्रशासन किंवा पोलिसांना कळवणे हेच योग्य ठरते.
अंधश्रद्धा नाकारूया, विज्ञान स्वीकारूया — हाच सुरक्षित आणि सशक्त समाजाचा मार्ग आहे.

