yuva MAharashtra धनगर आरक्षणाच्या आश्वासनाचा विश्वासघात; २९ जुलै रोजी 'विश्वासघात दिवस' पाळणार; विक्रम ढोणे

धनगर आरक्षणाच्या आश्वासनाचा विश्वासघात; २९ जुलै रोजी 'विश्वासघात दिवस' पाळणार; विक्रम ढोणे

जत वार्ता न्यूज
By -

फडणवीस सरकारवर धनगर विवेक जागृती अभियानाची टीका; बारामतीत आंदोलनाची घोषणा

जत | प्रतिनिधी : 
     धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देऊनही गेल्या बारा वर्षांत त्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेता समित्यांच्या माध्यमातून वेळकाढूपणा करण्यात आल्याचा आरोप धनगर विवेक जागृती अभियानाने केला आहे. या पार्श्वभूमीवर २९ जुलै रोजी बारामती येथे 'विश्वासघात दिवस' पाळण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे राज्य संयोजक विक्रम ढोणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
     प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, २०१४ मध्ये बारामती येथील शारदा प्रांगणावर धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू असताना तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता मिळाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
     मात्र, त्यानंतर तब्बल बारा वर्षांचा कालावधी उलटूनही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी विविध समित्या नेमून निर्णय लांबणीवर टाकण्यात आला असून, त्यामुळे समाजाची दिशाभूल झाल्याची भावना निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
     याच पार्श्वभूमीवर २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर शांततापूर्ण पद्धतीने 'विश्वासघात दिवस' पाळण्यात येणार असल्याचे विक्रम ढोणे यांनी सांगितले आहे. या आंदोलनाद्वारे २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत शासनाने धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. विक्रम ढोणे यांनी राज्य शासनाला धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून आरक्षणाचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, अशी मागणी केली आहे.