yuva MAharashtra विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान प्रभावीपणे राबवा; आ. गोपीचंद पडळकरांचे आवाहन

विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान प्रभावीपणे राबवा; आ. गोपीचंद पडळकरांचे आवाहन

जत वार्ता न्यूज
By -

भाजप जत शहर कार्यालयात आढावा बैठक; प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यावर भर

जत | प्रतिनिधी : 
     भारतीय जनता पक्षाच्या जत शहर कार्यालयात विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, पात्र मतदारांची नोंदणी आणि बूथस्तरावरील समन्वय अधिक सक्षम करण्याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
     बैठकीत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक उपाययोजना, मतदार यादीतील त्रुटींचे तातडीने निराकरण तसेच बूथस्तरावरील कार्य अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना उपस्थित पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
     यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, BLA-2 आणि कार्यकर्त्यांनी समन्वय, जबाबदारी व समर्पणाच्या भावनेतून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
     बैठकीस नगराध्यक्ष डॉ. रविंद्र अरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे, नगरसेवक परशुराम मोरे, सर्व नगरसेवक, BLA-2 प्रतिनिधी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     बैठकीत आगामी विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावी समन्वय ठेवून प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.