yuva MAharashtra लिंगायत समाज दफनभूमीचा कायापालट लवकरच; उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांची पाहणी

लिंगायत समाज दफनभूमीचा कायापालट लवकरच; उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांची पाहणी

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath ;

      जत शहरातील लिंगायत समाज दफनभूमीची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन या ठिकाणाच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दफनभूमीची पाहणी करण्यात आली.

     लिंगायत समाज दफनभूमीची दुरावस्था झाल्याने या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा लिंगायत समाजाचे नेते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली होती. त्यांनी यासंदर्भात नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी आणि उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांची भेट घेऊन प्रश्न मांडला होता.

     या मागणीची दखल घेत उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती मिथुन भिसे, गौतम ऐवळे, परशुराम मोरे, कुमार साळे, गोपाल पाथरूट, नगरपरिषद अभियंता, भा.ज.पा. जत शहराध्यक्ष आण्णा भिसे तसेच चंद्रकांत उर्फ पापा कुंभार आदी उपस्थित होते.

     पाहणीदरम्यान दफनभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी हायमास्ट पोल उभारणे, अंतर्गत रस्ता तयार करणे, बंद असलेली बोअरवेल सुरू करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, संपूर्ण परिसराची स्वच्छता करणे, तसेच दोन खोल्यांचे बांधकाम करून त्यामध्ये बाथरूम व शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे अशी कामे तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे ताड यांनी सांगितले. तसेच दफनभूमीच्या जागेचा प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

     उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी या प्रश्नाकडे तत्परतेने लक्ष दिल्याबद्दल लिंगायत समाज बांधवांकडून त्यांचे व संबंधित सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. दफनभूमीच्या विकासामुळे समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येला दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.