जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेची कार्यालये मात्र सांगलीतूनच चालविली जात असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. योजनेचे कार्यक्षेत्र जत तालुक्यात असताना विभागीय व उपविभागीय कार्यालये जत येथे स्थलांतरित करावीत, अशी ठाम मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.
सध्या विस्तारित म्हैसाळ योजनेचे मुख्य कार्यालय सांगली येथील वारणाली येथे कार्यरत आहे. उपविभागीय कार्यालय नामधारी आरग-बेडग येथे असले, तरी प्रत्यक्ष कामकाज सांगली मुख्यालयातूनच चालते. परिणामी ‘उंटावरून शेळ्या राखण्याचा’ प्रकार सुरू असून कामाचा दर्जा व गुणवत्ता रामभरोसे असल्याचा आरोप ढोणे यांनी केला.
जत तालुक्यातील शेतकऱ्यांना ना हरकत दाखला, पाणी मागणी अर्ज, नुकसान मोबदला आदी कामांसाठी वारंवार सांगलीला जावे लागते. मात्र तेथे गेल्यावर संबंधित अधिकारी उपलब्ध नसतात, “ते भागात गेले आहेत” अशी उत्तरे देऊन उडवाउडवी केली जाते, अशी तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची ही धावपळ थांबविण्यासाठी योजनेची सर्व कार्यालये कार्यक्षेत्र असलेल्या जत येथेच कार्यरत करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
म्हैसाळ विभाग क्रमांक २ चे कार्यक्षेत्र कवठेमहांकाळ, जत, सांगोला व मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यांमध्ये पसरलेले आहे. मात्र या विभागाचे मुख्यालय सांगलीत असून उपविभागीय कार्यालय कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे आहे. दुष्काळी पट्ट्याच्या मध्यवर्ती असलेल्या जत येथेच हे कार्यालय स्थलांतरित केल्यास जनतेची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे मत ढोणे यांनी व्यक्त केले.
जत येथे जलसंपदा विभागाची सुमारे ११ एकर जागा व इमारती उपलब्ध असतानाही स्थलांतराबाबत शासन व पाटबंधारे मंडळ प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. कार्यालय स्थलांतरासाठी अनेक वेळा आंदोलने करूनही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण, हे जनतेसमोर आले पाहिजे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असताना दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचेही ढोणे यांनी नमूद केले. दुष्काळी भागासाठी असलेली योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या दारी पोहोचावी, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

