राजे रामराव महाविद्यालय, जत येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
बोली भाषेत जिवंत गोडवा आहे. मराठी भाषेच्या 42 बोलीभाषा आहेत. प्रत्येक बोलीचे प्रदेशानुसार सौंदर्य वेगळे आहे. बोलीभाषा असे आणि संपन्न आहे. त्यामुळे बोलीभाषा बोलायला लाजू नका. शेतकरी आणि महिला वर्गाने नवनवीन शब्द निर्माण करुन मराठी भाषा समृद्ध केली आहे. दर्जेदार ग्रामीण बोली व ग्रामीण शब्द ही मराठी भाषेची समृद्धी आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा चे माजी प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता आणि कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.सुरेश पाटील हे होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ग्रामीण कवी महादेव सवाईसर्जे, प्रा.पाडुरंग वाघमोडे हे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य प्रो.डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, भाषा ही सर्वांना प्रेमाने एकत्र बांधून ठेवते. मराठी भाषेबरोबरच इतर भाषेवरही प्रेम केले पाहिजे. इंग्रजी ही ज्ञानभाषा असली तरी संकल्पना या मातृभाषेतूनच लवकर आकलन होतात. म्हणून प्रत्येकाने इंग्रजी बरोबरच मातृभाषा सुद्धा जपली पाहिजे, असे सांगून त्यांनी शब्दभांडार हे मराठी भाषेचे सौंदर्य आहे हे त्यांनी उदाहरणासहित पटवून दिले. तर यावेळी ग्रामीण कवी श्री.महादेव सवाईसर्जे यांनी आपल्या सुरेल आणि फर्ड्या आवाजात स्वरचित तर काही प्रसिद्ध कवींच्या कविता गाऊन कार्यक्रमात रंगत वाढवून उपस्थितांची मने जिंकले.
प्रारंभी मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. मराठी गौरव गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मराठी विभाग प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी आपल्या प्रस्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्याचे वाचन सहाय्यक प्राध्यापिका रेश्मा लवटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सदाशिव माळी यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा.कुमार इंगळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

