yuva MAharashtra धनगर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करा; आमदार गोपीचंद पडळकरांचा विधानसभेत सवाल

धनगर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करा; आमदार गोपीचंद पडळकरांचा विधानसभेत सवाल

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत केली. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला.
     पडळकर यांनी सांगितले की, धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील प्रकरण सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असून, याचा निकाल समाजाच्या भवितव्यावर परिणाम करणारा ठरणार आहे. एकीकडे समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे न्यायालयीन लढाईही सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारने धनगर समाजाबाबत ठाम व स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
     तसेच, तारखेच्या सुनावणीपूर्वीच सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच न्यायालयीन लढाईसाठी आवश्यक कागदपत्रे व मुद्दे सक्षमपणे मांडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
     धनगर समाजाला अद्याप अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचे सांगत, लोकसभेत किंवा राज्यसभेत समाजाचा एकही खासदार निवडून आलेला नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.