जत/प्रतिनिधी :
जत तालुक्यात गॅस टंचाईचे संकट गंभीर बनले असून, याचा फायदा घेत गॅस सिलेंडरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. काळ्या बाजारात एका भरलेल्या सिलेंडरसाठी तब्बल २५०० ते ३००० रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यात दररोज सुमारे २५० ते ३०० गॅस सिलेंडरचे वितरण केले जात असले, तरी घरपोच वितरण बंद केल्यामुळे ग्राहकांना एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. पूर्वी तीनचाकी गाड्यांद्वारे होणारे वितरण बंद करून प्रशासनाने एकाच ठिकाणी वितरण करण्याचे आदेश दिल्याने तालुक्याच्या विविध भागांतून नागरिक मोकळे सिलेंडर घेऊन एजन्सीकडे धाव घेत आहेत.
या परिस्थितीत विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, उन्हाळ्यातही तासन्तास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ओटीपी मिळूनही ग्राहकांना गॅस न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरातील काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार खुलेआम सुरू असल्याची चर्चा आहे. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील बिज्जरगी पेट्रोल पंपासमोरील एका दुकानात सिलेंडर जादा दराने उपलब्ध होत असल्याचे बोलले जात असून, काही हॉटेल व्यावसायिक हे सिलेंडर जादा पैसे देऊन खरेदी करत असल्याचे समोर येत आहे.
या सर्व प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून गॅसचा काळाबाजार रोखावा व सर्वसामान्य ग्राहकांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

