जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :
जत तालुक्यातील अंकलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड कन्या शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक बसवराज बिरादार यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा सांगली यांच्या वतीने भारतीय संविधान सन्मान अमृतमहोत्सवी गौरव वर्ष २०२५–२६ निमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत मुख्याध्यापक बिरादार यांचा गौरव करण्यात आला.
बसवराज बिरादार यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्यात शिस्त, संस्कार आणि सामाजिक मूल्यांची जडणघडण घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.
या सन्मानाबद्दल शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भीमराय बिरादार, धानप्पा शिंगे, जक्कण्णा कांबळे, सिद्दान्ना शिंगे, बाळासो नदाफ, सिद्धण्णा बिरादार, विठ्ठल कोळी, दशरथ पुजारी, अशोक मुचंडी, चंद्रशेखर पुजारी, सुभाष कोळी, सदाशिव बिरादार, रफिक नदाफ, कुमार चौगुले, अनिल चौगुले, अंबव्वा गवळी, आयाज नदाफ आदी उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनीही बसवराज बिरादार यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शिक्षक हा समाज घडवणारा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात योग्य संस्कार, ज्ञान आणि मूल्यांची पेरणी करणारा शिक्षकच खरा राष्ट्रनिर्माता ठरतो. प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पण भावनेने विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांना मिळणारा सन्मान हा संपूर्ण शिक्षण क्षेत्राचा अभिमान आहे. अशा शिक्षकांच्या कार्यातून समाजातील इतरांनीही प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

