जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
जत नगरपरिषदेकडून घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली असून कर न भरणाऱ्या नागरिकांवर नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत शहरातील तब्बल १२ नळ कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली.
नगरपरिषदेकडून चालू आर्थिक वर्ष २०२५–२०२६ मध्ये घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुख्याधिकारी लक्ष्मण रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी सात स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत.
कर वसुलीसाठी नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करत आहेत. शहरातील प्रमुख ठिकाणी डिजिटल फलक लावून तसेच दवंडी देऊनही घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नगरपरिषद प्रशासनाने आता कठोर कारवाईचा मार्ग अवलंबला आहे.
वसुली पथकांकडून थकबाकीदारांच्या मालमत्तांना भेट देऊन कर भरण्याची मागणी केली जात आहे. कर न भरल्यास नळ कनेक्शन तोडणे, जप्तीची कारवाई अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. नगरपरिषदेसाठी घरपट्टी व पाणीपट्टी हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत असल्याने वसुली न झाल्यास प्रशासनाला आर्थिक अडचणी निर्माण होतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
जप्ती व दंडात्मक कारवाईचा इशारा;
कर थकबाकीदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यानंतरही थकबाकी न भरल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकांवर प्रसिद्ध करण्याचा व थकबाकीच्या रकमेवर दंडात्मक व्याज लावण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे.
नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहरातील थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी लवकरात लवकर घरपट्टी व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

