yuva MAharashtra जतच्या पत्रकार भवनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही; आमदार गोपीचंद पडळकर | जतेत पत्रकार भवनचे भूमिपूजन

जतच्या पत्रकार भवनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही; आमदार गोपीचंद पडळकर | जतेत पत्रकार भवनचे भूमिपूजन

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     जत शहरातील पत्रकारनगर येथे पत्रकारांसाठी उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. आवश्यक असल्यास अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन गोपीचंद पडळकर यांनी केले.
     जत येथील पत्रकारनगर परिसरात सुमारे अकरा गुंठे जागेत पत्रकार भवन उभारण्यात येत आहे. या कामासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आमदार पडळकर यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपूजन करण्यात आले.
     या कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गोब्बी, पंचायत समिती सभापती सौ. अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, डॉ. शिवाजी खिलारे, रमेश देवर्षी, नगरसेवक परशुराम मोरे, विकास माने, योगेश बामणे, पालिका सभापती सुप्रिया बामणे, ठेकेदार आश्रय बन्नेणावर आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी पत्रकार परिषदेच्या वतीने किरण जाधव यांच्या हस्ते आमदार पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत परिषदेचे अध्यक्ष विजय रुपनूर यांनी केले, तर प्रस्ताविक ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांनी केले. यावेळी मारुती मदने, बादल सर्जे, प्रदीप कुलकर्णी, विठ्ठल ऐनापुरे, सोमनिंग कोळी, जॉकेश आदाटे, सुभाष कोकळे, नेताजी खरात, विजय नाईक, महेश गुरव, वीरपाक्ष येवले, नजीर चट्टरगी, गोपाल पाथरूट यांच्यासह पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार भवन दर्जेदार व्हावे – पडळकर
     या पत्रकार भवनामुळे तालुक्यातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध होणार असून पत्रकारांसाठी ही महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरणार आहे. कामासाठी अतिरिक्त निधी लागला तरी तो उपलब्ध करून दिला जाईल; मात्र बांधकाम दर्जेदार असावे आणि स्थानिक पत्रकारांना विश्वासात घेऊन काम पूर्ण करावे, अशा सूचना आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिल्या.