जत/प्रतिनिधी :
महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागात वास्तव्यास असलेल्या कन्नड भाषिक नागरिकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांबाबत जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सीमाभागातील कन्नड भाषिक नागरिकांच्या शिक्षण, रोजगार, शेती आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मिरज, गडहिंग्लज तसेच उदगीर या सीमाभागात लाखोच्या संख्येने कन्नड भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. अनेक दशकांपासून हे नागरिक आपल्या भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत येथे वास्तव्यास असले तरी त्यांना शिक्षण, रोजगार, शेती आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांबाबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
विशेषतः सीमाभागातील कन्नड माध्यमाच्या शाळांची स्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी शिक्षकांची कमतरता असून शाळांच्या इमारती व इतर आवश्यक पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेत दर्जेदार शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कन्नड शाळांचा विकास करून त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच सीमाभागातील युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेक तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागत असल्याची बाबही त्यांनी मांडली. युवकांना विविध योजनांमध्ये प्राधान्य देऊन नव्या रोजगार संधी निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या संदर्भात कर्नाटक शासनाचे कायदा व संसदीय कार्य तसेच सीमा व भूजल विषयक प्रभारी मंत्री एच.के. पाटील यांच्याशी यापूर्वी चर्चा झाल्याचे सावंत यांनी सांगितले. त्यावेळी मंत्री पाटील यांनी सीमाभागातील समस्यांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर सीमाभागातील कन्नड भाषिकांच्या शिक्षण, रोजगार, शेती आणि पाणीपुरवठा या महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक व तातडीने कार्यवाही करून त्याबाबत कर्नाटक शासनाकडे आवश्यक शिफारस करावी, अशी मागणी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या चर्चेदरम्यान संबंधित अधिकारी तसेच सीमाभागातील कन्नड भाषिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


