yuva MAharashtra संसद प्रवेशद्वारावरील राहुल गांधी यांच्या‘चाय पे चर्चा’ आंदोलनाचा जत भाजपकडून निषेध

संसद प्रवेशद्वारावरील राहुल गांधी यांच्या‘चाय पे चर्चा’ आंदोलनाचा जत भाजपकडून निषेध

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     संसद अधिवेशन सुरू असताना संसद प्रवेशद्वाराजवळ करण्यात आलेल्या ‘चाय पे चर्चा’ स्वरूपातील आंदोलनाचा जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो, अशी भूमिका व्यक्त करत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला.
     १२ मार्च रोजी संसद परिसरात राहुल गांधी आणि काही विरोधी पक्षांच्या खासदारांनी ‘चाय पे चर्चा’च्या स्वरूपात आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर जत येथे भाजपच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
      यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी संसद ही देशातील सर्वोच्च लोकशाही संस्था असल्याचे अधोरेखित केले. संसदेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आंदोलन करून तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे प्रकार टाळले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. संसदीय परंपरा आणि नियमांचे पालन करणे सर्व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
     या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ रवींद्र आरळी, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, भाजपचे सर्व नगरसेवक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या निषेधार्थ त्यांनी घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच भविष्यात संसदेसारख्या पवित्र लोकशाही संस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारे प्रकार होऊ नयेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.