yuva MAharashtra जत पंचायत समितीची पहिलीच सभा गाजली; बांधकाम, शिक्षण व आरोग्य विभागांवर प्रश्नांचा मारा

जत पंचायत समितीची पहिलीच सभा गाजली; बांधकाम, शिक्षण व आरोग्य विभागांवर प्रश्नांचा मारा

जत वार्ता न्यूज
By -

निकृष्ट कामांवर संताप व्यक्त; उमदी आरोग्य केंद्रातील चोरी प्रकरणी चौकशीची मागणी; बससेवा, रोजगार हमी व अंगणवाडी योजनांवर सखोल चर्चा

जत, प्रतिनिधी :
     जत पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर पार पडलेली पहिली सर्वसाधारण सभा विविध प्रश्नांमुळे चांगलीच गाजली. बांधकाम, शिक्षण व आरोग्य विभागांच्या कामकाजावर सदस्यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत अनेक मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरले.
      सभेच्या सुरुवातीला सदस्य महेश गावडे यांच्या सूचनेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांनी सभापती अर्चना पाटील व उपसभापती रवीकुमार बगली यांचे स्वागत केले. नवनिर्वाचित सदस्य विजय रुपनूर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडत सर्व सदस्यांचे तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचे कौतुक केले.
      सभेत बांधकाम विभागाच्या कामकाजावर सर्वाधिक टीका झाली. नव्याने उभारण्यात आलेल्या शाळा इमारतींमध्ये अल्पावधीतच गळती होत असल्याचे निदर्शनास आले. वायफळ येथील मॉडेल स्कूलची पत्रे उडाल्याने विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सदस्य विजय रुपनूर व प्रमोद सावंत यांनी निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत तीव्र आक्षेप नोंदवत संबंधित विभागाला जबाबदार धरले. यावर अधिकाऱ्यांनी दर्जेदार कामे करण्याचे आश्वासन दिले.
     आरोग्य विभागातही उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील भंगार चोरी प्रकरणी सभेत जोरदार चर्चा झाली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. याशिवाय परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर कारवाई व अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
     शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद शाळांमधून एकाही विद्यार्थ्याची निवड न झाल्याची बाब समोर येताच उपसभापती रवीकुमार बगली यांनी नाराजी व्यक्त केली. शिक्षणातील त्रुटी दूर करून गुणवत्तावाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
रोजगार हमीला गती देण्याचे निर्देश;
     आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मंजूर पायलट प्रकल्पांतर्गत रोजगार हमी योजनेतील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. विहिरी, जलसंधारण, वृक्षलागवड व रस्ते विकास कामे तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मस्टर वेळेत काढणे, मजुरांचे वेतन अदा करणे व आराखडे मंजूर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
बससेवा लवकर सुरू करण्याचा आग्रह;
     दरीबडची, शेगाव व उमदी भागासाठी मंजूर शालेय बससेवा अद्याप सुरू न झाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. जूनपूर्वी बससेवा सुरू करण्याच्या सूचना देत सभापती अर्चना पाटील यांनी आगारप्रमुख सुनंदा देसाई यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
अंगणवाडी व ‘लाडकी लेक’ योजनेवर भर;
     महिला व बालविकास विभागांतर्गत नवीन अंगणवाडी व मिनी अंगणवाडी इमारती उभारण्यावर भर देत ‘लाडकी लेक’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा;
     महावितरण, सामाजिक वनीकरण व वन विभागाचे अधिकारी बैठकीस अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधितांना नोटिसा बजावण्याचा तसेच पुढील बैठकीत गैरहजर राहिल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. 
शिक्षण व बांधकाम विभाग धारेवर;
     शिक्षण विभागातील रिक्त पदे, समायोजनातील त्रुटी व विद्यार्थ्यांची गैरसोय यावर तीव्र चर्चा झाली. मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रस्त्यांवरील अतिक्रमण, निकृष्ट बांधकामे व सौर ऊर्जा वाहिन्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.