जत/प्रतिनिधी :
जत येथील श्री यल्लमादेवी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जत यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली असून लवकरच ‘श्री. रेणुका मल्टीपर्पज हॉल’ भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शार्दूलराजे डफळे यांनी दिली.
यावेळी बोलताना श्रीमंत डफळे म्हणाले की, श्री यल्लमादेवी हे डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असून नवसाला पावणारी व जागृत देवी म्हणून तिची सर्वदूर ख्याती आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भरविण्यात येते आणि या यात्रेचे संपूर्ण नियोजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाते.
भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मंदिर परिसरात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘श्री. रेणुका मल्टीपर्पज हॉल’ उभारण्यात आला असून विवाह समारंभ तसेच विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी हा हॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच भाविकांना सुलभ आणि व्यवस्थित पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी भव्य दर्शन मंडपाचीही उभारणी करण्यात आली आहे.
सध्या मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू असून भाविकांसाठी सुलभ शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील काळात मंदिर परिसरात भव्य यात्री निवास व ऐतिहासिक म्युझियम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने दर अमावस्या व पौर्णिमेला अन्नप्रसादालय चालविण्यात येत असून हजारो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी नमूद केले.

