yuva MAharashtra मेहनत, बुद्धिमत्ता आणि चिकाटीचे फलित : प्रा. चंद्रहास हिप्परकर यांना शिक्षणशास्त्र विषयाची पीएच.डी.

मेहनत, बुद्धिमत्ता आणि चिकाटीचे फलित : प्रा. चंद्रहास हिप्परकर यांना शिक्षणशास्त्र विषयाची पीएच.डी.

जत वार्ता न्यूज
By -

वाळेखिंडीच्या सुपुत्राचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश; अनेक विषयांत सेट-नेट पात्र ठरलेले प्राध्यापक


जत/प्रतिनिधी :
     जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील सुपुत्र तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (डाएट) सांगली येथे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असलेले प्रा. चंद्रहास लक्ष्मण हिप्परकर यांनी शिक्षणशास्त्र विषयातून पीएच.डी. पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
     प्रा. चंद्रहास हिप्परकर यांनी आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा येथील प्रा. डॉ. विनय दत्तात्रय धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणशास्त्र विषयात संशोधन कार्य पूर्ण केले. दिनांक १३ मार्च २०२६ रोजी कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र विभागात त्यांनी आपला संशोधन प्रबंधाचे सादरीकरण केले. यावेळी अध्यक्ष प्रा. डॉ. अजय साळी, परीक्षक प्रा. डॉ. रविराज फुर्डे, मार्गदर्शक प्रा. डॉ. विनय धोंडगे तसेच विभागप्रमुख प्रा. डॉ. चेतना सोनकांबळे मॅडम हे उपस्थित होते. परीक्षकांनी संशोधन कार्याबद्दल समाधान व्यक्त करत सदर संशोधन प्रबंधास मान्यता दिली.
     प्रा. चंद्रहास हिप्परकर यांनी यापूर्वीही विविध विषयांमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक प्रगती साधली आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या विषयांत त्यांनी एम.ए. तसेच सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या सेट-नेट परीक्षांमध्ये अनेक विषयांत पात्र होणे हे त्यांच्या प्रखर बुद्धिमत्ता, अथक परिश्रम आणि चिकाटीचे द्योतक मानले जात आहे.
     घरगुती जबाबदाऱ्या, नोकरी आणि कुटुंब सांभाळत त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशात त्यांचे चुलते प्रा. एन. के. हिप्परकर, मार्गदर्शक प्रा.डॉ. विनय धोंडगे डाएटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, मित्रमंडळी तसेच त्यांच्या सौभाग्यवती यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
     प्रा. चंद्रहास हिप्परकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सांगली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.