जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
महापुरुषाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून जत तालुक्यातील एका व्यक्तीला सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची माहिती समोर आली. ही पोस्ट व्हायरल होताच विविध सामाजिक संघटना आणि युवकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. शनिवारी संतप्त कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, संतप्त जमावाकडून संबंधित व्यक्तीला मारहाण झाल्याचीही माहिती मिळाली. त्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या कृत्याबद्दल जाहीर माफी मागितल्याचे सांगितले जाते. पुढील कारवाईसाठी कार्यकर्त्यांनी त्याला जत पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीवर यापूर्वी चेक बाऊन्स प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यामुळे पोलिस त्याचा आधीपासून शोध घेत होते. या घटनेदरम्यान तो पोलिसांच्या हाती लागल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व सामाजिक सलोखा राखावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

