yuva MAharashtra आधुनिक शेतीसाठी कृषी विभागाने अधिक सक्रिय व्हावे : आ. गोपीचंद पडळकर

आधुनिक शेतीसाठी कृषी विभागाने अधिक सक्रिय व्हावे : आ. गोपीचंद पडळकर

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     दुष्काळी पट्ट्यातील शेती अधिक आधुनिक, उत्पादनक्षम आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर करण्यासाठी कृषी विभागाने अधिक सक्रिय भूमिका घेतली पाहिजे, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. जत येथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
     महाराष्ट्र शासनाच्या व जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जत येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी अवजारे तसेच नवीन शेती पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. आमदार पडळकर यांनी प्रदर्शनातील विविध कृषी स्टॉलना भेट देत उपलब्ध तंत्रज्ञानाची पाहणी केली.
     यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेती अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित केली. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
     कार्यक्रमास प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. याशिवाय सरदार पाटील, शिवाजी खिलारे, कविता पाटील, रमेश देवर्षी, विजय रुपनर, परशुराम मोरे, अतुल मोरे, सुभाष गोब्बी, नाथाभाऊ पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
     या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध अनुदान (सबसीडी) योजनांची माहिती देण्यात आली. ट्रॅक्टर, कृषी अवजारे व मळणी यंत्रांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी सुमारे १०० शेतकऱ्यांना ट्रॅक्टर सबसीडीची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.