yuva MAharashtra जतच्या बाजारपेठेत भटकी कुत्रे व मोकाट जनावरांचा धुमाकूळ; प्रश्न कायमस्वरूपी सोडवू – नगरसेवक विकास माने

जतच्या बाजारपेठेत भटकी कुत्रे व मोकाट जनावरांचा धुमाकूळ; प्रश्न कायमस्वरूपी सोडवू – नगरसेवक विकास माने

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :

     जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे दुचाकीस्वार तसेच लहान मुले ही भटक्या कुत्र्यांचे लक्ष्य बनत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रश्न जत नगरपरिषदेच्या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल, असे आश्वासन नगरसेवक विकास माने यांनी दिले.

     जत शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिकन व मटण विक्रीची दुकाने आहेत. या दुकानांमधून पडणारे चिकन व मटणाचे तुकडे खाण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री जमा होतात. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या वाहनांच्या पाठीमागे कुत्री धाव घेत असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. तसेच ही कुत्री लहान मुलांवरही भुंकत किंवा धाव घेत असल्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     याचबरोबर जत शहरातील विविध प्रभागांसह प्रमुख बाजारपेठेत मोकाट जनावरे कळपाने फिरताना दिसतात. ही जनावरे रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला भाजीपाला व फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना तसेच अबालवृद्ध नागरिकांना या जनावरांचा विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

     दरम्यान, शहरात रात्रीच्या वेळी फिरणेही धोकादायक बनले आहे. भटक्या कुत्र्यांचे कळप अचानक हल्ला करण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर असून जत नगरपरिषदे च्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे नगरसेवक विकास माने यांनी सांगितले.