जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
जत शहरातून जाणाऱ्या मंगळवेढा–ऐगळी राज्य मार्गावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत असून हा खड्डा तात्काळ बुजवून वाहनधारकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
जत शहरातून मंगळवेढा – ऐगळी या राज्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. अथणी व बेळगाव कडे जाणारी अनेक वाहने याच मार्गाने ये-जा करतात. दरम्यान, या मार्गावर गटाराचे काम सुरू असताना जत नगरपरिषदेकडून रस्त्यावर मोठा खड्डा करण्यात आला आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या या खड्ड्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
खड्डा मोठा असल्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी बॅरिकेट्स लावून उपाययोजना केली आहे. मात्र या बॅरिकेट्समुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून सततच्या वाहतुकीमुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांकडून प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून हा खड्डा बुजवावा, अशी मागणी जोर धरत आहे.
याशिवाय याचमार्गावरील नदाफ मोहल्ला चौकातही अशाच प्रकारचा मोठा व धोकादायक खड्डा गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्याची तक्रार करण्यात येत आहे. या ठिकाणीही अपघाताचा धोका कायम असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोन्ही खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पापा कुंभार यांनी दिला आहे.

