yuva MAharashtra कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराला संखमधील ग्रामस्थांचे जीवदान; वनविभागाकडे सुपूर्द

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराला संखमधील ग्रामस्थांचे जीवदान; वनविभागाकडे सुपूर्द

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
     जत तालुक्यातील संख येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोराला ग्रामस्थांनी वेळीच मदत करून जीवदान दिल्याची घटना घडली आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या मोरावर उपचार करून त्याचे प्राण वाचवण्यात आले असून नंतर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
     संख–गुडपूर मार्गावर तुकाराम बाबा महाराज यांचे आश्रम आहे. रविवारी रात्री तुकाराम बाबा आश्रमाकडे जात असताना रस्त्यालगत कुत्र्यांच्या टोळीने एका मोरावर हल्ला केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या हल्ल्यात मोर गंभीर जखमी झाला होता. परिस्थिती पाहताच तुकाराम बाबा यांनी तत्काळ कुत्र्यांना हुसकावून लावले आणि जखमी मोराला सुरक्षितपणे आश्रमात आणले. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मोरावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती वनविभागालाही देण्यात आली. दरम्यान प्रकाश गडदे, संजय फंड, शिवकन्या नरळे, म्हाळप्पा डोळळी आदी ग्रामस्थांनी आश्रमात येऊन जखमी मोरावर उपचार करण्यासाठी मदत केली.
     उपचारांमुळे मोराच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सोमवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संख येथे येऊन त्या मोराला ताब्यात घेतले. पुढील काळजीसाठी त्याला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले. ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे प्राण वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.