समालखा (हरियाणा) :
संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २६व्या बाबा गुरबचन सिंह मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात हरियाणातील समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळी पार पडला. देशभरातील विविध राज्यांमधून निवड झालेल्या २४ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत क्रीडा कौशल्याबरोबरच बंधुभाव, शिस्त आणि खेळभावनेचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
फेब्रुवारी २०२६ मध्ये स्पर्धेला प्रारंभ झाला होता. युवा खेळाडूंनी उत्साह, समर्पण आणि खेळभावनेने सामने खेळत आपली प्रतिभा प्रभावीपणे सादर केली. खेळाच्या माध्यमातून सहकार्य, सहनशीलता, शिस्त आणि परस्पर आदर यांसारखी जीवनमूल्ये अंगीकारत त्यांनी निरंकारी मिशनच्या शिकवणीचे प्रत्यक्ष आचरण कृतीतून दाखवून दिले.
१० मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पंजाबमधील फिरोजपुर आणि राजस्थानमधील श्री गंगानगर या संघांमध्ये रोमांचक लढत झाली. या सामन्यात श्रीगंगानगर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोनू राजपूत (श्रीगंगानगर) यांना “सामनावीर” पुरस्काराने गौरविण्यात आले.
या संपूर्ण स्पर्धेचे संयोजन संत निरंकारी मंडळ चे सचिव जोगिंदर सुखीजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून युवकांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. स्पर्धेदरम्यान प्रेम, परस्पर सन्मान आणि सौहार्दाची भावना वृद्धिंगत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व सहभागी खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेदरम्यान दररोज सायंकाळी युवकांसाठी सत्संग कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश युवकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्याबरोबरच आध्यात्मिक जागरूकता, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक शांततेसाठी प्रेरित करणे हा होता.
समारोप समारंभात संत निरंकारी मंडळाच्या प्रचार विभागाचे मेंबर-इनचार्ज राकेश मुटरेज यांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या वेळी त्यांनी खेळाडूंना संबोधित करताना ‘जोशसोबत होश’ ठेवण्याचा सतगुरूंचा संदेश अधोरेखित केला. जीवनातील प्रत्येक कार्यात परमात्म्याचे दर्शन घडवून त्यांचे गुण आचरणात आणावेत, असे त्यांनी सांगितले.
ही स्पर्धा बाबा गुरबचन सिंग यांना समर्पित असून बाबा हरदेव सिंग यांच्या प्रेरणेने लुधियाना येथे याची सुरुवात झाली होती. आज सुदिक्षा माताजी आणि रमीताजी यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून समाजात प्रेम, एकोपा आणि सौहार्दाची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला असून सहभागी सर्व २४ संघांनी त्याची प्रभावी प्रचिती घडवून दिली.

