जत/प्रतिनिधी :
लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत शहरात आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर पुतळा, विजापूर रस्ता येथे १३ एप्रिल २०२६ रोजी उपोषणास बसण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ प्रभावीपणे कार्यान्वित करून त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणे, शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या जीवनकार्याचा समावेश करणे, प्रत्येक जिल्ह्यात गरीब विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृहे उभारणे, तसेच बसवेश्वर जयंतीला राष्ट्रीय स्तरावर साजरी करून सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशा विविध मागण्या निवेदनात नमूद आहेत.
शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावण्याचे आदेश देणे, महाराष्ट्र विधानभवन परिसरात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारणे तसेच लिंगायत समाजाच्या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी विशेष आराखडा मंजूर करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ‘बसव आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था’ स्थापन करणे, बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा प्रसार करण्यासाठी स्वतंत्र अकादमी उभारणे आणि महिला बचत गटांना विशेष प्रोत्साहन देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
जोपर्यंत शासन स्तरावर ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. संबंधित उपोषणास प्रशासनाने परवानगी देऊन सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. हे निवेदन सागर कोरे व लिंगायत समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.

