जत/प्रतिनिधी :
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त जत येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून युवा कीर्तनकार ह.भ.प. संस्कार महाराज खंडागळे (पंढरपूर) यांच्या कीर्तनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे.
श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, जत यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर विविध धार्मिक उपक्रम राबविले जातात. कोरोना काळात महिनाभर रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करून ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपली होती. तसेच नवोदित कीर्तनकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी गेल्या पाच वर्षांपासून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
बुधुवारी, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी राजे शिवाजी महाराज नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे अभिषेक व विधीवत पूजा होईल. सकाळी ९ ते १० या वेळेत रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत संस्कार महाराज खंडागळे यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता आरती व पुष्पअर्पण करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
मंदिरात भक्तांच्या सहकार्याने साडेअकरा किलोची पितळी प्रभावळ बसविण्यात आली असून त्यामुळे गाभाऱ्याची शोभा अधिक खुलून दिसत आहे. याशिवाय, भविष्यात अन्नछत्र सभागृह व वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचा ट्रस्टचा मानस आहे.
या कार्यक्रमास सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

