yuva MAharashtra दुचाकीवर वीज कोसळून तरुण ठार; एक जखमी, एक बचावला

दुचाकीवर वीज कोसळून तरुण ठार; एक जखमी, एक बचावला

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     कंठी (ता. जत) परिसरात विजांच्या कडकडाटात दुचाकीवरून घरी परतणाऱ्या तरुणावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आयाज फिरोज मुजावर (वय २४, रा. बाज) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेत एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर दुसरा युवक बचावला.
     मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कंठी परिसरात विजांचा कडकडाट, वाऱ्यांचा जोर आणि तुरळक पावसाच्या सरी सुरू होत्या. आयाज मुजावर व त्याचे मित्र कंठी येथे मुरघास तयार करण्याचे काम करत होते. वातावरण बिघडल्याने ते तिघे मोटारसायकलवरून आपल्या बाज गावाकडे परतत होते. याच दरम्यान अचानक वीज कोसळून आयाज याचा जागीच मृत्यू झाला.
     घटनेनंतर त्याला तातडीने कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत नारायण शिवाजी हाके (रा. बाज) हा युवक बचावला, तर सोबत असलेला अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
     दरम्यान, तालुक्यातील इतर ठिकाणीही विजांच्या तडाख्यामुळे नुकसान झाले आहे. येळवी परिसरात लक्ष्मण गायकवाड यांच्या शेतातील विद्युत खांब कोसळले, तर टोणेवाडी येथे अंकुश टोणे यांच्या घरासमोरील कडब्याला वीज पडून आग लागल्याची घटना घडली.
     अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी पावसाळी व विजेच्या वातावरणात खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.