जत/प्रतिनिधी :
जत तालुक्यातील तिकोंडी येथे शेतकरी व युवकांसाठी संयुक्त संवाद व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ही बैठक गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या बैठकीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मन्सूर चाचा खतिब तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना, अनुदान व बँकिंग सुविधांचा शेतकऱ्यांना प्रभावी लाभ कसा मिळेल, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी थेट जाणून घेऊन त्यावर उपाययोजना आखण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
यासोबतच युवकांसाठी स्वतंत्र संवाद सत्र आयोजित करण्यात आले असून रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि संघटन बळकटीकरण यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील युवक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
दारीबड जिल्हा परिषद गटाचे नेते अमोल कराडे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धनगर समाजाचे नेते जालिंदर (मामा) होनमाने यांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
शेतकरी, युवक व स्थानिक नेतृत्व यांना एकत्र आणून विकासाचा मार्ग ठरवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या संवाद बैठकीकडे तिकोंडी व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

