yuva MAharashtra आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा; केंद्रप्रमुख रतन जगताप

आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा; केंद्रप्रमुख रतन जगताप

जत वार्ता न्यूज
By -

येळवी आश्रम शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात


जत/प्रतिनिधी :
       येळवी येथील श्री संत ज्ञानेश्वर आश्रम शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास निगडी खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख रतन जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
     यावेळी श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूलचे प्राचार्य नंदकुमार खंडागळे, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक महेश बाबानगर, वर्गशिक्षक सिद्धराया हूबनूर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव करण्यात आला.
       राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. इयत्ता दुसरीतील समृद्धी विठ्ठल यादव हिने राज्यात १६ वा व केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला, तर इयत्ता चौथीतील गौरी गोविंद खांडेकर हिने राज्यात ६९ वा व केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनींचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. निरोप समारंभात सातवीतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी दिलेले संस्कार व शिक्षण आयुष्यभर लक्षात ठेवू, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
     प्रमुख पाहुणे रतन जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात संस्कार व मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. उपलब्ध शैक्षणिक संधींचा योग्य उपयोग करून शिक्षणात प्रगती साधावी, पुस्तकांशी मैत्री करावी तसेच आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
     प्राचार्य नंदकुमार खंडागळे यांनी शिक्षणासोबतच मूल्य शिक्षणाची गरज अधोरेखित केली, तर मुख्याध्यापक महेश बाबानगर यांनी विद्यार्थ्यांना भावनिक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली. वर्गशिक्षकांनीही विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल गडदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपरीन मणियार मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.