जत/प्रतिनिधी :
वाढत्या बुवाबाजीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तहसीलदार प्रविण धानोरकर यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात बुवाबाजीच्या नावाखाली समाजात अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची आर्थिक, मानसिक आणि सामाजिक फसवणूक होत असल्याचा गंभीर मुद्दा मांडण्यात आला. काही ठिकाणी या प्रकारांना लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांचे थेट किंवा अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला असून, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे काही ठोस मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बुवाबाजी करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, संबंधित प्रकरणांत सहभागी असलेल्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, बुवाबाजीमुळे समाजात अज्ञान, भीती आणि अंधविश्वास वाढत असून, यामुळे सामाजिक प्रगतीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर तातडीने नियंत्रण आणणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी आरपीआयचे नेते संजय कांबळे, कॉ. हणमंत कोळी, कॉ. मीना कोळी, भूपेंद्र कांबळे, जकाप्पा सर्जे, अर्जुन कुकडे, भास्कर कोळी, प्रशांत नाईक, सुरेश खुडे, रहिम मुल्ला यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


