yuva MAharashtra जत शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्यापासून वाचला; नगराध्यक्ष डॉ. आरळी यांच्या तत्परतेने जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती

जत शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्यापासून वाचला; नगराध्यक्ष डॉ. आरळी यांच्या तत्परतेने जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावातून जत शहराकडे येणारी मुख्य पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी अचानक फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, वेळेत योग्य निर्णय घेत नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी आणि नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने काही तासांतच दुरुस्ती पूर्ण झाली आणि संभाव्य पाणीटंचाई टळली.
     जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख स्रोतांपैकी असलेल्या बिरनाळ तलावातून येणारी पाइपलाइन अचानक फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू झाली होती. ही गळती वेळेत थांबवली नसती, तर शहरातील अनेक भागांत दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता होती.

तातडीची कारवाई, वेगवान दुरुस्ती-
     घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष डॉ. आरळी यांनी कोणताही विलंब न लावता घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी आणि तंत्रज्ञांना तातडीने कामावर लावण्यात आले. आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने काही तासांतच पाइपलाइनची गळती रोखून दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. दुरुस्तीचे काम सुरू असताना नगराध्यक्ष स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कामावर देखरेख करत होते. त्यांच्या या तत्परतेमुळे मोठे संकट टळल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
     या जलद कारवाईमुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहराचा पाणीपुरवठा ही आमची प्राथमिकता आहे. तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी तातडीने दुरुस्ती करण्यात आली, असे मत नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले.
     या प्रसंगी नगरसेवक परशुराम मोरे, कुमार साळे, प्रमोद हिरवे, गौतम ऐवाळे, मिथुन भिसे, अविनाश सोनुले, अतुल मोरे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.