जत/प्रतिनिधी :
जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील सेवेत सुधारणा करणे अत्यावश्यक असल्याचे मत पंचायत समिती सभापती अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केले. संख येथे आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, कविता पाटील, पंचायत समिती सदस्य आप्पा दुर्गेकर, भाजप युवा नेते नाथा पाटील तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमा शिरसागर यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आरोग्य सेवांमधील अडचणी, उपलब्ध सुविधा तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना अधिक परिणामकारक व दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः माता-बाल आरोग्य, लसीकरण मोहिमा तसेच ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्यांवर विशेष भर देण्यात आला.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एकूणच, या बैठकीत ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढवून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

