जत/प्रतिनिधी :
जत तालुक्यात सध्या ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या भीषण तापमानामुळे पशुधनावर मोठे संकट ओढवले आहे. अचकनहळ्ळी येथील शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल घेत सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती सभापती सौ. सावित्रीताई तम्मणगौडा रवीपाटील यांनी जत येथे पशुसंवर्धन विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तालुक्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी आणि औषधोपचारासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीला जिल्हा परिषद सांगलीचे शिक्षण व आरोग्य विभाग माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (सांगली जिल्हा) सरचिटणीस श्री. तम्मणगौडा रवीपाटील यांची विशेष उपस्थिती होती. तालुक्यात पशुसंवर्धन विभागाची ८६ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवेवर ताण येत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी ज्या ठिकाणी चार गावांत मिळून एकच दवाखाना आहे, तिथे आठवड्यातून किमान एकदा तरी डॉक्टरांनी भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधणे आणि उपचार करणे अनिवार्य असल्याचे निर्देश सौ. सावित्रीताई तम्मणगौडा रवीपाटील यांनी दिले.
याप्रसंगी सभापतींनी स्वतः जत येथील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाला भेट देऊन औषध साठा आणि स्टोअर रूमची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाकडून तालुक्यासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याची खातरजमा त्यांनी यावेळी केली. तसेच ट्रॅक्टर वाटप, विहीर बांधकाम आणि सायकल कोळपे वाटप यांसारख्या विविध कृषी योजनांच्या अनुदानाची मागणी दुप्पट करून ती शासन स्तरावर तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या आढावा बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. बी. गुंजाटे, डॉ. गोंदाटे, पाटील मॅडम आणि इतर पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते. येत्या ५ तारखेला पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन रिक्त पदांचा प्रश्न आणि औषधोपचाराचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे सौ. सावित्रीताई तम्मणगौडा रवीपाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

