जत/प्रतिनिधी :
मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ महामार्गाच्या स्वातंत्र्यवीर शहीद शिवाजी धनगर यांच्या नावाने नामकरण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात रासपचे जिल्हाध्यक्ष बंडू डोंबाळे यांचे वतीने तहसीलदार, जत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल नगारजी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई–पुणे दरम्यान सुरू असलेला ‘मिसिंग लिंक’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येत असून, या मार्गाचे नामकरण ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीच्या नावाने व्हावे. शहीद शिवाजी धनगर यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
या नामकरणामुळे स्थानिक भूमिपुत्रांचा गौरव होण्यासोबतच भावी पिढीला इतिहासाची जाणीव होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती जतन करणे ही काळाची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित मार्गास शहीद शिवाजी धनगर यांचे नाव देण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

