yuva MAharashtra ‘डिजिटल इंडिया’ला तडा; महा-ई-सेवा केंद्राचा सर्व्हर दोन दिवस ठप्प, पालक-विद्यार्थ्यांची गैरसोय

‘डिजिटल इंडिया’ला तडा; महा-ई-सेवा केंद्राचा सर्व्हर दोन दिवस ठप्प, पालक-विद्यार्थ्यांची गैरसोय

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी : 
     शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्राचा सर्व्हर मागील दोन दिवसांपासून बंद पडल्याने विद्यार्थ्यांच्या शालेय दाखल्यांसाठी पालकांना ताटकळत बसावे लागत आहे.
     शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती अर्ज, जात व उत्पन्न दाखले, रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी महा-ई-सेवा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र सर्व्हर बंद असल्याने अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक विद्यार्थी व पालक निराश होऊन परत जात आहेत.
     विशेषतः अकरावी, पदवी व इतर शैक्षणिक प्रवेशाचा हंगाम सुरू होणार असल्याने या सेवांची गरज अधिक वाढली आहे. वेळेत दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश व इतर शैक्षणिक प्रक्रिया अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही पालकांनी यासाठी वारंवार फेऱ्या मारूनही काम न झाल्याची खंत व्यक्त केली.
     दरम्यान, संबंधित विभागाकडून सर्व्हर बंद पडण्याचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नसून, तो लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. डिजिटल सेवांचा लाभ सुरळीत मिळावा यासाठी तांत्रिक यंत्रणा सक्षम करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.